एआय तिकिटांचा सुळसुळाट; रेल्वेने थोपटले दंड; विशेष पथके तैनात

उपनगरीय नेटवर्कवर बनावट आणि एडिटेड तिकिटांच्या वाढत्या प्रकरणांविरुद्ध मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कारवाई तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक प्रवासी एआयने एडिट केलेल्या, मॉर्फ केलेल्या किंवा फोटोकॉपी केलेल्या तिकिटांसह प्रवास करताना पकडले गेले आहेत. ही गंभीर फसवणूक आहे. याविरोधात रेल्वेने दंड थोपटले आहेत. रेल्वेने मोठय़ा प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली आहे.

फसवणूक करणारे वेगवेगळय़ा क्लृप्त्या वापरत आहेत. रेल्वेच्या मते तिकीट बुकिंगच्या वेळी एक अद्वितीय अल्फान्यूमेरिक कोड तयार केला जातो. जो खऱया तिकिटांची ओळख पटवण्यासाठी एक प्रमुख साधन आहे. बनावट किंवा संपादित तिकिटांमध्ये हा कोड नसू शकतो. जो तपासणी पथकांद्वारे त्वरित शोधला जातो.

नकली तिकिटांविरोधात रेल्वेने मोहीम तीव्र केली आहे. स्थानके आणि गाडय़ांवर विशेष एआय फसवणूक पथके तैनात केली जात आहेत. ही टीम संशयास्पद तिकिटे ओळखेल आणि प्रवाशांचे ओळखपत्र तपासेल. जर सीझन तिकीट किंवा प्रवास तिकिटावरील तपशील ओळखपत्राशी जुळत नसेल तर कारवाई केली जाईल. सुरळीत तपासणी सुनिश्चित करण्यासाठी जीआरपीशी समन्वय वाढविण्यात आला आहे.

 बनावट तिकिटाने प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. रेल्वेने इशारा दिला आहे की, बनावट तिकिटे खरेदी करणे किंवा वापरणे हे भारतीय दंड संहिता 2023-318(2), 336(3), 336(4), 340(1), 340 (2) आणि 3/5 च्या विविध कलमांखाली गुन्हा आहे. दोषी आढळल्यास दंड आणि सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.