
खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. घाणेरड्या स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे रात्रभर झोप नाही. एकाच सीटवर तीन जणांना झोपावे लागले. जागेअभावी अनेकांना सीटखाली, टॉयलेट जवळ झोपावे लागले. विद्यार्थ्यांना अक्षरशः खुराड्यांमध्ये कोंबड्या कोंबल्यासारखे जनरल डब्यामध्ये ठेवले. अशा एक ना अनेक गैरसोयींचा सामना करत दिल्लीहून विशेष रेल्वेने 489 विद्यार्थी रात्री उशिरा पुण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्लीत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गेलेले 1300 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यामुळे एक विशेष रेल्वेगाडी दिल्लीतून शनिवारी सोडण्यात आली. शनिवारी संध्याकाळी चार वाजता ही रेल्वे दिल्ली स्टेशन वरून निघाली. यापैकी भुसावळ येथे 530, नाशिक येथे 180, कल्याण येथे 146 विद्यार्थी उतरले. रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे या प्रवासात विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. याबद्दल विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली यूपीएससी विद्यार्थी समन्वयक राजेश बोनावटे म्हणाले की दिल्लीतील आंबेडकर स्टेडियम आणि गोल मार्केट येथे सकाळी 10 वाजता तपासणीसाठी बोलावले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तपासणी सुरू झाली नाही. दिवसभर आम्ही अन्नपाण्याशिवाय होतो. संध्याकाळी चार वाजताची रेल्वे रात्री दहा वाजता निघाली. रेल्वेत एसी कोच रिकामे असताना आम्हाला जनरल कोचमध्ये बसवले. एका सीटवर तीन चार विद्यार्थ्यांना बसवले. जेवायला नाही, प्यायला पाणी नाही, स्वच्छतागृहही घाणेरडे होते. काही विद्यार्थी सीटच्याखाली तर काही टॉयलेट जवळ झोपले. प्रवासात आम्ही उपाशी होतो
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतली काळजी
दिल्लीमध्ये असल्यापासून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे आमच्या संपर्कात होते. त्यांनी आमची मनमाड, भुसावळ आणि कल्याण रेल्वे स्टेशनवर जेवणाचीही सोय केली. त्यांच्यामुळेच आम्ही महाराष्ट्रात येऊ शकलो. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, दिल्ली पोलीस यांनी अजिबात सहकार्य केले नाही. परंतु श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे निघाल्यापासून कायम आधार दिला, अशी भावना राजेश बोनावटे यांनी व्यक्त केली.



























































