
रेल्वे प्रवासी कोणत्याही ठोस कारणाशिवाय ट्रेनमध्ये असलेली आपत्कालीन साखळी ओढत (अलार्म चेन पुलिंग) आहेत. त्यामुळेच उपनगरीय लोकलसह मेल- एक्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 3424 चेन पुलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या केवळ एकाच गाडीला लेटमार्क मिळत नाही तर मागून येणाऱया अनेक गाडय़ांना विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी पुरेशा कारणाशिवाय चेन ओढू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
लोकल ट्रेनबरोबरच मेल-एक्प्रेस गाडय़ांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याकडे मोटरमनचे आणि गार्डचे लक्ष वेधता यावे म्हणून सर्वच डब्यांमध्ये आपत्कालीन साखळी उपलब्ध करून दिली आहे, पण त्याचा प्रवाशांकडून गैरवापर होत आहे. गाडी स्थानकावर पोहचण्यास उशीर होणे, थांबा नसलेल्या स्थानकात गाडी थांबावण्यासाठी, सहप्रवाशाला उशीर होणे या किरकोळ कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडत आहेत. त्याचा थेट परिणाम गाडय़ांच्या वेळापत्रकावर होत आहे. रेल्वेच्या मुंबई विभागात दर तीन-चार मिनिटांना एक गाडी धावते. त्यावर चेन पुलिंगचा विपरीत परिणाम होत असून अनेक गाडय़ांना लेटमार्क होतो. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या एका वर्षाच्या काळात 3,424 अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी 1,980 घटनांमध्ये ठोस कारण न आढळल्याने संबंधित प्रवाशांवर कारवाई करत 9 लाख 90 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दोन महिन्यांत 778 घटना
चालू वर्षात 1 जानेवारीपासून 10 मार्च या सवादोन महिन्यांच्या काळात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 778 अलार्म चेन पुलिंगच्या घटना नोंद झाल्या आहेत. त्यापैकी 661 प्रवाशांवर कारवाई करून 4 लाख 54 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.




























































