
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांना मोफत वायफाय सेवा मिळणार आहे. स्थानकाबाहेरील बेस्ट बसथांब्यावर रेल्वे प्रशासनाने भलीमोठी जाहिरात केली आहे. या जाहिरातीत स्थानकाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असा पूर्ण उल्लेख न करता इंग्रजाळलेल्या रेल्वे प्रशासनाने ‘CST’ ही अक्षरे लिहिली आहेत. तसेच मराठी भाषेचीही या जाहिरातीत वाट लावण्यात आली आहे.
‘स्थानकावर’ऐवजी ‘स्टेशनवर’ तसेच ‘मिळवा’ऐवजी ‘मिलवा’ असे अशुद्ध मराठी लिहिण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण मुंबई विभागाने या जाहिरातीची गंभीर दखल घेतली असून जाहिरातीचा फलक तत्काळ हटवण्याची मागणी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदेशी आणि रेल्वे पोलिसांकडे केली आहे. अन्यथा शिवसेना हा फलक उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिला आहे.




























































