
रेल्वेचे आरक्षण चार्ट आता पूर्वीपेक्षा लवकर तयार होणार आहे. त्यामुळे कन्फर्म आणि वेटिंग तिकिटाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत जी अनिश्चितता असायची, ती आता बऱयाच प्रमाणात संपणार आहे. रेल्वे बोर्डाने 16 डिसेंबर रोजी याबाबत नवीन आदेश जारी केले. त्यानुसार, आता ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट सुमारे 10 तास आधी तयार केला जाईल.
अनेकदा असे दिसून येते की, ट्रेन सुटण्याच्या काही तास आधीपर्यंत प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म होईल की नाही, हे स्पष्ट होत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वेने या वर्षी जूनमध्ये 8 तास आधी चार्ट बनवण्याची व्यवस्था सुरू केली होती. आता प्रवाशांची सोय आणखी वाढवण्यासाठी ही वेळ 10 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या मते, चार्ट लवकर तयार झाल्यामुळे प्रवाशांना वेळेत दुसरा पर्याय निवडण्याची संधी मिळेल.
आता वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. पूर्वी अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचल्यावरच तिकीट कन्फर्म झाले की नाही हे जाणून घेऊ शकत होते. नवीन नियमामुळे प्रवाशांना स्थिती लवकर स्पष्ट होईल, ज्यामुळे ते आपल्या प्रवासाची योजना बदलू शकतील किंवा रिफंड घेऊ शकतील.
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाही सीट आणि कोचची माहिती लवकर मिळेल. यामुळे त्यांना वेळेवर स्टेशनवर पोहोचणे, सामान पॅक करणे आणि प्रवासाची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.
कोणत्या वेळेच्या ट्रेनचा चार्ट बनणार?
रेल्वे बोर्डाच्या नवीन आदेशानुसार, ट्रेनच्या वेळेनुसार चार्ट बनवण्याचे नियम ठरवण्यात आले आहेत.
सकाळी 5ः01 ते दुपारी 2ः00 वाजेपर्यंत सुटणाऱया ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत तयार केला जाईल.
दुपारी 2ः01 ते रात्री 11ः59 वाजेपर्यंत धावणाऱया ट्रेनसाठी पहिला चार्ट किमान 10 तास आधी तयार होईल.
रात्री 12ः00 ते सकाळी 5ः00 वाजेपर्यंत सुटणाऱया ट्रेनचा चार्टही 10 तास आधी तयार केला जाईल.



























































