
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा परिणाम हिंदुस्थानवरही होत आहे. त्यामुळे देशातील ऋतुचक्र बदलत आहे. दरवर्षी देशभरात 15 मार्चपासून उकाडा जाणवायला सुरुवात होतो. मात्र, यंदा मार्च संपत आला तरीही उत्तरेत अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. त्यातच आता उत्तरेत हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदलाचे वारे वाहत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मार्च महिना संपणार आहे, परंतु उत्तर हिंदुस्थानात अद्याप उकाड्याला सुरुवात झालेली नाही. सतत सक्रिय असलेल्या पश्चिमी वाऱ्यांमुळे हवामान थंड आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी आहे. उंच पर्वतीय प्रदेशात हिमवर्षावही सुरू आहे.
हवामान विभागाच्या (IMD) मते, सोमवारी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवार दिल्लीत हलका पाऊस आणि जोरदार वाऱ्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या इतर अनेक भागांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागांमध्ये हिमवृष्टी होत आहे. सक्रिय पश्चिमी वाऱ्यांमुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्येही पर्वतरांगा थंडी आणि बर्फाने झाकलेल्या राहतात. यामुळे मैदानी प्रदेशात थंड वारे वाहत असून उष्णता कमी होत आहे. हवामान तज्ञांच्या मते, यावर्षी मार्च महिन्यात अनेक पश्चिमी वारे एकापाठोपाठ एक सक्रिय होत आहेत. या प्रणाली पश्चिम आशियातून येत असून उत्तर भारतावर परिणाम करत आहेत. यामुळे ढगांची हालचाल कायम राहते आणि तापमान वाढत नाही.
राज्यात उकाड्याला सुरुवात झाली असून मुंबई, ठाणे परिसरात आर्द्रताही वाढत असल्याने प्रंचड उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४-५ दिवसांत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र मेघगर्जन, सोसाट्याचा वारा व पावसाची शक्यता. काही भागात गारपिटीची शक्यता आहे.

























































