
ज्येष्ठातली पौर्णिमा अर्थातच वटपौर्णिमा होऊन गेली, तरी पावसाचा थांगपत्ताच नाही. याआधी अवकाळी पावसाने दोन वेळा दापोलीला चांगलेच झोडपले होते. आता मोसमी पावसाच्या भरवशावर अवलंबून असलेले शेतकरी खरीप हंगामातील शेतीकामासाठी सज्ज झाले आहेत, मात्र पावसाचा थेंबही पडत नसल्याने शेतीची कामे पूर्णतः रखडलेली आहेत.
रोहिणी नक्षत्रात धानाच्या पेरणीची मूठ सोडली जाते. धान पेरणीसाठी शेत जमीनीची नांगरट करताना कडक जमिनीमुळे शेतकरी आणि नांगर ओढणाऱ्या बैलांची चांगलीच दमछाक होत आहे त्यामुळे कधी एकदाचा पाऊस पडेल. यासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, मात्र पाऊस काही कोसळत नाही. त्यामुळे तो चिंतातूर झाला आहे.
बरोबर 3 वर्षांपूर्वी 3 जून 2020 ला निसर्ग चक्रीवादळाने दापोलीत हाहाकार माजवला होता. त्याच्या आठवणी आजही ताज्याच आहेत. तो जरी दिवस आठवला आणि झालेल्या नुकसानाचे चित्र डोळ्यासमोर आले की, प्रत्येक नुकसानग्रस्तांच्या अंगावर शहारे येतात. कधी समाधानकारक, तर कधी अति नुकसान करणारा तर कधी भरवसा नसलेल्या अशा या लहरी हवामानाच्या मोसमी पावसावर कोकणातील शेती अवलंबून आहे.
घरातील ज्येष्ठ मंडळी आठवणी सांगतात की, नियमित आणि वेळेवर पावसाची सुरुवात झाल्यामुळे वटपौर्णिमेला कुडईंमध्ये भाताची लावणी केली जायची कितींदा तरी असे घडले आहे, मात्र यावर्षी अजूनही पेरणीच झाली नाही. त्यामुळे लावणी करणे तर दुरची बात राहिली आहे. लांबलेल्या पावसामुळे तालुक्यातील गावागावांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. अनेक ठिकाणच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. बोरवेलना पाणी येईनासे झाले आहे. नद्या आटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावात भीषण पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही काही गावांत तर आठवड्यानंतर पाणी सोडले जातेय, पण ते पुरसे नसते. टॅंकरने पाणीपुरवठा करायचे म्हटले, तर विहिरींनी तळ गाठल्याने आणि नद्या आटल्याने टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवायचे तरी कुठून हा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
बदलत्या हवामानातील वातावरणाचा फटका पर्जन्यमानावर होत असून आणखी काही काळ अशीच परिस्थिती राहिली, तर अनेक ठिकाणच्या लोकांना केवळ पाण्यासाठी स्थलांतर करावे लागणार आहे. त्याचा परिणाम हा दूरगामी होणार आहे. कोकणातील शेती ही मोसमी पावसाच्या भरवशावरच अवलंबून असते. सध्या मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला असला, तरी मात्र पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत सर्वच कामे खोळंबलेली आहेत. याचा थेट परिणाम हा अर्थकारणावर होणार आहे.