
दिवाळी तोंडावर आली आहे. बाजारपेठांमध्ये मुंगीला देखील चालायला जागा नाही अशी गर्दी आहे. एकीकडे लोकं खरेदीत व्यस्त असताना वरुणराजा मात्र या खरेदीवर पाणी फेरण्याच्या बेतात आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध भागात हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता खरेदी करताना लोकांना घराबाहेर पडताना छत्र्या घेऊन बाहेर पडावं लागणार आहे.
पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. कोकणातील अनेक भागात मंगळवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी भातकाढणीला सुरुवात झाली असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.




























































