आष्टी तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; घर, फळबागांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ, सोलापूरवाडी, कुंबेफळ, खरडगव्हान, पिंपळा भागात बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता वादळीवारा आणि मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. शेतातील कांदा भिजला तर फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आष्टी तालुक्यामध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यात काल पडलेल्या पावसाने वातावरणात बदल झाला आहे.

दिवसभर तापमानात वाढ होत होती. मात्र, सायंकाळी 5.30 वाजता आष्टी तालुक्यातील खुंटेफळ परिसरातील सोलापूरवाडी, कुंबेफळ, खरडगव्हान, पिंपळा परिसरात अचानक आलेल्या वादळीवारा व मेघगर्जनेसह जोरदार पावसाने घरांचे आणि फळबागांते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही घरांवरील पत्रे उडून गेले. तर काही घरांवर झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे अनेकांच्या घराचे नुकसान झाले आहे. अनेकाच्या आंब्याची बाग उध्वस्त झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा काढून ठेवला होता तो पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने परिसरात अंधार पसरला आहे. नुकसानग्रस्तांना शासनाने मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.