
लातूर शहर आणि परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी चार वाजता सुरू झालेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर जिल्ह्यात दमदार सरी बरसल्या आहेत. उकाड्याने त्रस्त झालेले लातूरकर या पावसाने सुखावले. लातूर जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात बुधवारी पावसाचे आगमन झाले. या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
मागील काही वर्षांपासून लातूर जिल्ह्यात मृग नक्षत्रात कमी पाऊस होत असे. या वर्षी मान्सून चांगला असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात चार दिवस मान्सूनपूर्व पावसाने सर्वांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. दुपारीपर्यंत पावसाळी वातावरण नसताना अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला असून जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. उदगीर शहर आणि तालुका, अहमदपूर शहर आणि तालुका, निलंगा तालुका ,औसा तालुका, लातूर तालुका , रेणापूर तालुका, शिरूर अनंतपाळ तालुका , देवणी तालूका, जळकोट तालुक्यात पावसाचे आगमन झाले. शहरात पाऊस सुरू झाल्यानंतर विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.





























































