संगमेश्वर तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम पाऊस, पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यात सलग दोन दिवस ढगाळ वातावरण नंतर गुरुवारी संध्याकाळी रिमझिम पावसाने सुरुवात केली त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून रस्ते चिखलमय झाले आहेत . यावर कहर म्हणजे गुरुवारी सायंकाळी 7.30 वा खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल 15 तासांनी सुरळीत झाला .

गुरुवारी संध्याकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आंबा बागायतदारांनी राहिलेला आंबा उतरविण्यास सुरुवात केली मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आंबा पूर्णपणे तयार झाला असून पावसामुळे तो उतरवण्यास लगबग सुरू झाली आहे. शेतकरी वर्गाने शेतीची राहिलेले कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाळा सुरूवात झाल्याने बाजारपेठेमध्ये याचा परिणाम जाणवू लागला आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे महामार्ग चिखलमय झाला आहे.

वीज पुरवठा 15 तास खंडित

संगमेश्वर तालुक्यामध्ये गुरुवारी संध्याकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे . तालुक्यातील विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी ७ : ३० वा खंडित झाला गुरुवारची रात्र संपूर्ण अंधारात काढावी लागली. संगमेश्वरला वीज पुरवठा करणाऱ्या निवळी आणि आरवली या दोन्ही 33 केव्ही लाईन एकाचवेळी नादुरुस्त झाल्याने हा बिघाड आज सकाळी 11 वा . दूर झाला आणि जवळपास 15 तासांनंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला . पहिल्याच रिमझिम पावसात महावितरणची अशी गत होणार असेल , तर पुढील पावसाळा काढायचा कसा असा संतप्त सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे .