पावसाच्या हलक्या सरी कोसळताच कोकणात पेरण्यांना प्रारंभ

364

रोहीणी नक्षत्र सुरु झाले की त्याच दिवशी कोकणातील शेतकरी भात पेरणीला प्रारंभ करतो. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोकणच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सकाळी भात पेरण्यांना प्रारंभ केला आहे. शुक्रवारी दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने आता दरारोज सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडून भातरोपांची अपेक्षित वाढ होइल अशी आशा शेतकरी वर्गाला वाटत आहे.

‘पेरणी’ हा शेतीच्या कालचक्रामधील एक अपूर्व सोहळाच असतो. शेतकऱ्यांच्या घरातील छोट्या मुलांपासून सर्व मंडळी सकाळच्या प्रसन्न वेळी पेरणीसाठीचे सर्व साहित्य घेऊन शेतामध्ये दाखल होतात. भात पेरणीचे काम जरी कमी वेळाचे असले, तरी त्याची पूर्वतयारी खूप मोठी असते. शेतकऱ्यांच्या घरामध्ये पेरणी हंगाम म्हणजे जणू एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. पेरणीने शेतीचे कालचक्र प्रत्यक्ष सुरु होत असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतांतून निसर्गदेवतेचे श्रीफळ देवून स्मरण करतात. शेतकऱ्यांमध्ये असणारी ही श्रध्दाच त्यांना नेहमी बळ देत असते.

संगमेश्वर तालुक्यासह कोकणच्या विविध भागात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शेतांमधून पहिलं पाणी पडताच उत्साहित झालेल्या शेतकरी वर्गाने लगेचच पेरणीचा निर्णय घेतला. आज सकाळी अनेक ठोकाणी शेतांमधून राजा-सर्जाच्या जोड्या दाखल झाल्या. मोठ्या उत्साहामध्ये भात पेरणीला प्रारंभ झाला. पुढील काही दिवस पावसाच्या अशाच हलक्या सरी कोसळून भात रोपांची उत्तम वाढ होइल अशी आशा शेतकरी वर्गाला वाटत आहे. आज झालेल्या पेरण्यांच्या ठिकाणी पावसाची उत्तम साथ मिळाल्यास 20 जून पर्यंत लावणीचा हंगामही सुरु होऊ शकेल असे मत शेतकरी वर्गाने व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या