
पश्चिम किनारपट्टीवरून जाताना ‘तौकते’ चक्रीवादळाने मुंबईकरांना जोरदार तडाखा दिला असताना मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया 7 पैकी 6 तलावांमध्ये मात्र गेल्या चार दिवसांत 430 मिलीमीटर पाण्याचा वर्षाव केला आहे. यात विहार आणि तुळशी तलावांमध्ये सर्वात जास्त पाणीसाठा जमा झाला.
‘तौकते’ चक्रीवादळामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया 7 पैकी 6 तलावांमध्ये 17 ते 20 मे या चार दिवसांत 430 मिलीमीटर पाणीसाठा जमा झाला. यात सर्वाधिक म्हणजे 210 मिलीमीटर एवढा पाऊस हा विहार तलाव परिसरात झाला असून या खालोखाल तुळशी तलाव परिसरात 178 मिलीमीटर पाऊस झाला. मोडक सागरमध्ये 102 मिलीमीटर, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ 62 मिलीमीटर, तानसा 59 मिली मीटर, भातसा 29 मिलीमीटर एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे तर अप्पर वैतरणा तलावात पाऊस पडला नाही.




























































