मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी; 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने महिन्याअखेरीस मुंबईसह राज्यात दमदार हजेरी लावली आहे. पाच दिवसांपूर्वी गोवा आणि कोकणात दाखल झालेल्या पावसाने आगेकूच करत राज्यभरात बरसायला सुरुवात केली आहे. या पावसाने पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पाण्यासाठी वणवण करणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मॉन्सून राज्यातील 90 टक्के भागात दाखल झाला असून आगामी 24 तासात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने महिन्याअखेरीस बरसायला सुरुवात केली आहे. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. नंदुरबार जिल्ह्यात रात्री व सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोलापूर, नागपूर, बुलढाणा, पुणे, परभणी जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, संगमनेर, राहुरी आदी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. जामखेड तालुक्यातील साकत, पिंपळवाडी, सावरगाव, धोत्री, मोहा, नानेवाडी, कोल्हेवाडी, सौताडा या परिसरात दोन तास मुसळधार पाऊस झाला. शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव, मठाची वाडी, दहिगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह तब्बल दोन तास पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले असून ओढे- नाले भरून वाहत आहेत. बुलडाणा  जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

मुंबई आणि ठाण्यातही पावसाने सोमवारी हजेरी लावली आहे. ठाणे शहरातील पाचपाखडी, नौपाडा, घोडबंदर रोड, कळवा मुंब्रा येथे पावसाच्या सरी बरसल्या. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत ढगाळ वातावरण असून तुरळक पाऊस पडत आहे. शहरातील वांद्रे ते बोरिवली परिसरात दोन तास पाऊस पडला. मुलुंडसह नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, कोकणसह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.