नगर शहरासह जिल्ह्यात महिन्यानंतर पावसाचे पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-rain

सामना प्रतिनिधी । नगर

शहरासह जिल्ह्यात आज दुपारपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरवातीला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. सायंकाळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती. नगर जिह्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. पण, पेरण्यायोग्य पाऊस झाला नव्हता. शहराच्या केडगाव, देहरे, विळद, खारेकर्जुने, बुर्हारनगर, भिंगार, सावेडी आदींसह तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. माळीवाडय़ासह इतर भागांत विजपुरवठा खंडित झाला होता. शहरातील नालेगाव, दिल्लीगेट आदी भागांत पाणी साचले होते.

जिल्ह्यात गेल्या ३५ दिवसांत ३३ टक्के पावसाची नोंद झाली असून, गेल्यावर्षी याच कालावधीतील ३५ दिवसांत ३७.६५ टक्के पावसाची नोंद झाली होती. नगर जिह्यात १ व २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. यंदा दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून शेतकऱयांनी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागती सुरू केल्या होत्या.