
मुंबईत शनिवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील 24 तासांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान, 60 मिमी ते 200 मिमी पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे अवघ्या तीन तासांत 88 मिमी पावसाची नोंद झाली. IMD च्या अहवालानुसार सांताक्रूझमध्ये रात्री 8.30 पर्यंत 115.8 मिमी पाऊस झाला आहे.
शनिवारी सकाळची सुरुवात मुंबईत हलक्या पावसाने झाली. सायंकाळी 5 नंतर पावसाने मुसळधार स्वरूप धारण केले. आयएमडीच्या अहवालानुसार दहिसरमध्ये 143.01 मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर विक्रोळी आणि मरोळमध्ये 119.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम भागात सर्वाधिक 96 मिमी पावसाची नोंद झाली.
IMDच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नैऋत्य मान्सून 24 तासांपूर्वी कोकणात सक्रिय झाला आहे. येत्या 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

























































