
सामना ऑनलाईन, बीड
दरवर्षी प्रमाणे मुक्ताबाईची पालखी पंढरपूरकडे जाताना बीड जिल्ह्यात दाखल होताच पावसाने या पालखीचे स्वागत होते यंदाही पालखीचे पदस्पर्श जिल्ह्यात होताच पावसाला सुरुवात झाली. गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही चमत्कारिक परंपरा आहे. बीड जिल्ह्यात संत मुक्ताबाईच्या पालखीचे आगमन होताच पावसाला सुरुवात होते. मोठ्या श्रद्धेने पालखीचे भर पावसात स्वागत केले. जाते पंधरा दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाचे आज संत मुक्ताबाईच्या पालखी सोबत आगमन झाले. पंढरपूरकडे प्रस्थान करण्याआधी मुक्ताबाईचा बीड शहरात दोन दिवस मुक्काम असतो.
बीड मध्येच बिंदुसरा नदीच्या तीरावर त्यांचे आजोबा श्रीधरपंत यांची समाधी आहे. या समाधीचे दर्शन घेऊन वारकरी पुढे मार्गस्थ होतात. दरम्यान पावसाने ओढ दिल्याने धोक्यात आलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभर काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ व्यापले होते तर दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र सायंकाळपासून बीड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे संकटात सापडलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.






























































