
अश्लील चित्रपट प्रकरणी अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अखेर जामीन मिळाला आहे. न्यायदंडाधिकारी कोर्टाने कुंद्राला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच कुंद्राच्या कंपनीचा आयटीप्रमुख असलेला रायन थॉर्प यालाही कोर्टाने जामीन दिला आहे.
अश्लील चित्रपट तयार करून त्याचे वेगवेगळ्या ऍपच्या सहाय्याने प्रसारण केल्याच्या आरोपाखाली 19 जुलै रोजी गुन्हे शाखेने राज कुंद्रासह तिघांना अटक केली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केल्यानंतर राज कुंद्रा याने जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच सदरच्या आरोपपत्रात आपल्याविरोधात कोणताच पुरावा नसल्याचा दावा करून जामीन देण्याची विनंती केली होती.
त्याची दखल घेत न्यायदंडाधिकारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे.






























































