
महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आणि शिवसेना-मनसे युतीची बुधवारी घोषणा झाली. मुंबईतील हॉटेल ब्ल्यू सी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असे ठामपणे सांगितले.
कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा हे मी एका मुलाखतीत म्हटलो होतो. तिथून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली, असे युतीची घोषणा करताना राज ठाकरे म्हणाले. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या खूप टोळ्या फिरताहेत. त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात, असा टोलाही राज ठाकरे यांनी हाणला.
मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र आले आहेत – संजय राऊत
ते पुढे म्हणाले की, जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढणाऱ्या सगळ्या उमेदवारांना दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची हे आपल्याला कळवले जाईल. आज फक्त आपल्यासमोर एक गोष्ट सांगू इच्छितो. बरेच दिवस महाराष्ट्र याची प्रतिक्षा करत होता. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करतो आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ फिरतोय त्यात ते ‘अल्ला हाफीज’ म्हटले आहेत. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत, असेही राज ठाकरे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
























































