दुबार मतदारांना फोडून काढा! राज ठाकरेंचा घणाघात; कल्याण, डोंबिवलीतील साडे चार हजार मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केल्याचा पर्दाफाश

कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीतील साडे चार हजार मतदारांनी मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातही मतदान केले आहे, असा पर्दाफाश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मतचोरीविरोधात निघालेल्या विराट मोर्चाला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी दुबार मतदारांना फोडून काढा असे म्हणत खणखणीत इशारा दिला.

फॅशन स्ट्रीटपासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंतभाई पाटील, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनिल प्रभू, आमदार सचिन अहीर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर, अनिल देशमुख, सुनिल लंके, भाई जगताप, कृष्णा रेड्डी आणि लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला.

आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. मतदार यादीमध्ये दुबार मतदार असून याबाबत माझ्यासह उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत आहेत. शेकाप, कम्युनिस्टचे मतदार आणि भाजप, शिंदे, अजित पवारांचे लोकही बोलत आहेत. मग कुणी अडवले आहे? निवडणूक घेण्याची घाई का करताहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मतदार याद्या साफ करा, मतदार याद्या पारदर्शक करा आणि मग निवडणुका घ्या, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली.

कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमध्ये साडे चार हजार मतदारांनी मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघातही मतदान केलेले आहे, असा पर्दाफाश करत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांची काही नावे वाचूनही दाखवली. असे लाखो दुबार मतदार असून महाराष्ट्रभर मतदानासाठी वापरले गेले असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी कोणत्या मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची यादीही वाचून दाखवली.

मुंबई नॉर्थ लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार 456 मतदार आहेत. यापैकी 62 हजार 370 हे दुबार मतदार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात 16 लाख 76 हाजर 861 मतदार असून दुबार मतदार 60 हजार 231 आहेत. मुंबई नॉर्थ इस्ट मतदारसंघात 15 लाख 90 हजार 710 मतदार असून दुबार मतदारांची संख्या 92 हजार 983 आहे. मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात एकूण मतदार 16 लाख 81 हजार 48 असून दुबार मतदार 63 हजार 740 आहेत. मुंबई साऊथ सेंट्रलमध्ये मतदार 14 लाख 37 हजार 676 असून दुबार मतदार 50 हजार 565 आहेत. मुंबई साऊथमध्ये 15 लाख 15 हजार 993 मतदार असून दुबार मतदार 55 हजार 205 आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात 19 लाख 34 हजार 349 मतदार असून यात दुबार मतदार 99 हजार 673 आहेत. मावळ लोकसभेत 19 लाख 85 हजार 172 मतदार असून दुबार मतदार 1 लाख 45 हजार 636 आहेत. पुणे लोकसभेत मतदारसंघात 17 लाख 12 हजार 242 मतदार आहेत आणि दुबार मतदार 1 लाख 2 हजार 02 आहेत, तर ठाणे लोकसभेत 2 लाख 9 हजार 981 दुबार मतदार आहेत, अशी आकडेवारीच राज ठाकरे यांनी सादर केली.

पुरावा म्हणून दुबार मतदारांची यादीच आणल्याचेही राज ठाकरे यांनी दाखवले. हे सर्व दुबार मतदार असून महाराष्ट्रात काय गोंधळ सुरू आहे हे यावरून दिसत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, एवढे पुरावे दिल्यानंतरही कोर्टाचा आदेश आहे म्हणत निवडणुका घ्यायचा हट्ट सुरू आहे. कुणाला घाई आहे? पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत. अजून एक वर्ष गेले तर काय फरक पडणार आहे? पण जी माणसे आतमध्ये भरली आहेत त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटोपून घ्यायच्या आणि यश पदरी पाडायचे. याला काय निवडणुका म्हणतात? याच्यातून लोकशाही तरी टिकेल? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

सत्तेचा माज बघा. एक आमदार सांगतो मी 20 हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली. दुसरीकडे नवी मुंबईमध्ये आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेले आहेत. कुणीतरी सुलभ शौचालयात नोंदवला गेला. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट देशभर सुरू आहे. 232 आमदार निवडून आल्यानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा असेल होता. ही सगळी कारस्थाने निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू आहेत. मग निवडणुका कशा लढवायच्या? उन्हा तान्हात रांगेत उभा राहून मतदान करणाऱ्याचा हा अपमान नाही का? मतदारांनी मतदान नोंदवायचे, पण मॅच अगोदरच फिक्स आहे. मग त्याच्या मताला काय किंमत आहे? असा सवाल करत जेव्हा कधी निवडणुका होतील, तिकडे दुबार मतदार आले तर तिथेच फोडून काढायचे, बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. त्याशिवाय महाराष्ट्रात चाललेला कारभार वठणीवर येणार नाही, असा इसाराही राज ठाकरे यांनी दिला.