सत्तेसाठी भाजपने लोकशाहीचा गळा आवळला! राज ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाला गोकुळमध्ये सत्ता मिळाली नाही म्हणून लोकशाहीची तत्त्वे गुंडाळून ठेवली आहेत. एकीकडे लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे काढायचे आणि दुसरीकडे गोकुळमध्ये लोकशाहीचा गळा आवळायचा, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. सत्ताधारी पक्षच विरोधी पक्षाच्या विरोधात लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चा काढतो हे जगातील एकमेव उदाहरण असेल, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

गोकुळमधील सत्तासंघर्षावरून राज ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे भाजपवर घणाघाती टीका केली. गोकुळच्या निवडणुकीत भाजप पॅनलचे 12, तर सतेज पाटील पॅनलचे 13 संचालक निवडून आले. मात्र भाजपला सत्ता मिळविता न आल्याने सरकारने तातडीने पाच संचालकांची नियुक्ती केली आणि त्यांना मतदानाचा अधिकारही दिला. हीच का तुमची लोकशाहीची बूज, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. बॅलेट पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक होऊनही निकाल मान्य नसेल तर लोकशाही वाचविण्याच्या भाजपच्या घोषणा केवळ ढोंग असल्याची टीका त्यांनी केली.

रडीचा डाव खेळणे बंद करा

गेल्या 12 वर्षांपासून भाजपने मिळविलेले बहुमत विरोधकांनी सहन केले. आता जनतेचा कल विरोधी पक्षांकडे झुकू लागला आहे, तर भाजपनेही ते सहन करण्याची तयारी ठेवावी. भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असे राज ठाकरे यांनी ठणकावले. सत्तेत असताना लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढायचे आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळायचा. देशात अतिरेकी हल्ले झाले, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा अर्थव्यवस्था डबघाईला आली तरी हेच लोक देश वाचवा, अर्थव्यवस्था वाचवा म्हणून मोर्चे काढतील, असा टोलाही त्यांनी लगावला.