आजचा दिवस खास, रजनीकांत ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने होणार सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार दशकांपासून हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. एप्रिलमध्ये या पुरस्काराची घोषणा झाली होती. 25 ऑक्टोबर रोजी रजनीकांत यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रजनीकांत दिल्लीत होणाऱया पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा दिवस खास आहे. चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो, अशा भावना रजनीकांत यांनी पुरस्काराच्या पूर्वसंध्येला व्यक्त केल्या. तसेच याप्रसंगी आपले गुरू के. बालाचंदर हयात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.

चेन्नई येथे पत्रकारांशी संवाद साधताना रजनीकांत म्हणाले, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला याबद्दल मी खूप आनंदी आहे. मला हा पुरस्कार मिळेल अशी कधीच अपेक्षा नव्हती. मला हा पुरस्कार मिळाला, पण केबी सर (के. बालाचंदर) आपल्यात नाहीत याचे वाईट वाटतंय.

रजनीकांत यांनी म्हटलंय, सोमवारचा दिवस दोन गोष्टींसाठी खास आहे. एक म्हणजे हिंदुस्थान सरकारकडून मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळत आहे, तर दुसरीकडे माझी मुलगी सौंदर्या विशगन हिचे स्वतंत्र ऍप येतंय. ‘हूटे’ असे या ऍपचे नाव आहे. त्याचे लाँचिंग करताना मला आनंद होतोय.