
रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारी सकाळी राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले. राजापूर शहर जलमय झाले असून अडकलेल्या नागरिकांनी बोटीतून बाहेर काढले जात आहे.
राजापुरातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापुरात एक अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. कोदवली नदीला पूर आल्याने राजापुरात हाहाःकार उडाला आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात सरासरी 115 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक 153 मिमी पाऊस राजापूरात पडला आहे. रत्नागिरी 72 मिमी, चिपळूण 123 मिमी, लांजा 123 मिमी, मंडणगड 137 मिमी, खेड 118 मिमी, दापोली 79 मिमी, गुहागर 132 मिमी आणि संगमेश्वर 102 मिमी पाऊस पडला आहे.




























































