राजापूरचे पासपोर्ट कार्यालय नव्याने कार्यरत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉकडाऊनमध्ये येथील पोस्ट कार्यालयामध्ये दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करण्यात आले होते. कोरोना संसर्गाचा ज्वर कमी झाल्यानंतर नव्या वर्षामध्ये खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नाने हे कार्यालय नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे कोरोनानंतर तळकोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचा पासपोर्ट काढायचा मार्ग सोप्पा झाला आहे. याबाबत संगमेश्वर तालुक्यातील रहिवाशांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांना निवेदन दिले होते .

कोकणवासियांची परदेशीवारी सुरळीत व्हावी, परदेशवारीसाठी आवश्यक असलेला पासपोर्ट काढण्याची सुविधा कोकणातील लोकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी म्हणून दोन वर्षापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून पासपोर्ट कार्यालय मंजूर करून घेतले. त्याचा शुभारंभ दोन वर्षापूर्वी झाला. शुभारंभानंतर या पासपोर्ट कार्यालयाचा कोकणातील हजारो लोकांना फायदा होताना त्यांची परदेशवारी सुरळीत झाली. तर, अनेकांचे विमानातून परदेशवारी करण्याचे स्वप्न साकार झाले.

कोरोनाच्या महामारीमध्ये दिवसागणिक कोरोनाचे संक्रमण वाढत चालले होते. ते रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जारी केले. त्यामध्ये खाजगी उद्योगधंद्यांसह काही शासकीय कार्यालयेही बंद करण्यात आली होती. त्यामध्ये दोन वर्षापूर्वी येथील पोष्ट कार्यालयाच्या येथे सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालयही बंद करण्यात आले होते. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने शासनाने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत काही क्षेत्रासाठी अनलॉक केले. त्यामध्ये खाजगी उद्योगधंद्यांसह विविध खाजगी आणि शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. त्यातच, लॉकडाऊनमध्ये ठप्प असलेली समाजव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेले येथील पासपोर्ट कार्यालय सुरू झालेले नव्हते. त्यामुळे परदेशवारी करू इच्छीणार्‍यांची चांगलीच गैरसोय झाली होती. कोरोनाच्या महामारीमध्ये बंद करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार राऊत, आमदार राजन साळवी यांनी प्रयत्न केले. त्यांना यश येवून हे कार्यालय पुन्हा सुरू झाले आहे.

त्यामुळे नव्याने पासपोर्ट काढणार्‍यांसह ज्यांच्या पासपोर्टची वैधता संपल्याने नुतनीकरण करावयाचे आहे त्यांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबत संगमेश्वर येथील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांना धन्यवाद दिले आहेत

आपली प्रतिक्रिया द्या