काँग्रेस धोकेबाज पक्ष! बसपचे 6 आमदार पळवल्यानंतर मायावतींचा थयथयाट

708


महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मेगा गळती लागलेली आहे. तर तिकडे राजस्थानात काँग्रेसने बसपला गळती लावली आहे. बसपने विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला समर्थन दिलं होतं. सत्ता स्थापन झाल्यानंतर आपले आकडे बळकट करण्यासाठी काँग्रेसने मित्र पक्षाचेच आमदार पळवलेत. यामुळे बसपच्या अध्यक्षा मायावती भयंकर संतापल्या आहेत. कोणत्याही अटीविना बसपने राजस्थानात काँग्रेसला समर्थन दिलं होतं. तरीही काँग्रेसने त्यांचे आमदार पळवल्याने मायावतींनी आता काँग्रेसवर धोकेबाज असल्याची टीका करायला सुरुवात केली आहे.

मायावती यांनी ट्विटरचा आधार घेत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की “राजस्थानमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा मित्र पक्ष असलेल्या बसपचे आमदार फोडून ते भरवसा ठेवण्यालायक नसल्याचे आणि धोकेबाज असल्याचं सिद्ध केलं आहे. बसपने राजस्थानमध्ये कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा दिला होता तरीही पक्षासोबत दुसऱ्यांदा केलेला हा विश्वासघात आहे. ”

मायावती यांनी एकूण तीन ट्विट केली असून अन्य ट्विटमध्ये म्हटलंय की काँग्रेस विरोधकांशी मुकाबला करण्याऐवजी मित्र पक्षांशी दगाबाजी करण्यातच धन्यता मानत आली आहे. याच काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभा निवडणूक जिंकू दिली नाही आणि त्यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मानही केला नाही. हे अत्यंत वेदनादायी आणि दुख:द आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मायावती यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलंय की आम्ही त्यांच्या पक्षाचे आमदार फोडलेले नाहीत. राज्याचे हित लक्षात घेून हे 6 आमदार स्वेच्छेने काँग्रेसमध्ये आल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यामध्ये स्थिर सरकार असावे यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या