आसारामला सहा महिन्यांचा ‘वैद्यकीय’ जामीन मंजूर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा आणि न्यायमूर्ती संगीता शर्मा यांच्या खंडपीठाने बुधवारी हा निर्णय दिला.

जोधपूरच्या  मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसारामने प्रकृतीचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता. सध्या तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांना वयाशी संबंधित अनेक आजार, तसेच दोन वेळा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. जामिनाच्या काळात साक्षीदारांवर दबाव टाकता येणार नाही. आसारामला अनुयायांशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. जामिनाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा तुरुंगात हजर राहावे लागेल.