बोंबला! ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो अचानक आला घरी, हत्येच्या आरोपाखाली 2 भाऊ भोगताहेत शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले असून ज्याला मृत समजून अंत्यसंस्कार केले तो व्यक्ती अचानक 5 महिन्यांनी घरी आल्याने सर्वच अवाक झाले. विशेष म्हणजे त्याच्याच हत्येच्या आरोपाखाली दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटकही केली होती आणि ते सध्या तुरुंगात शिक्षाही भोगत आहेत. हा सर्व प्रकार पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

‘लाईव्ह हिंदुस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील इसरी पोलीस स्थानक भागातील मोरी गावात 6 फेब्रुवारीला एक तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. पोलीस तपासात हा मृतदेह राजस्थानमधील डूंगरपुर येथील खरपेडा गावातील ईश्वर नावाच्या तरुणाचा असल्याचे समोर आले. ईश्वर याची पत्नी, मेहुणा आणि सासरा यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मात्र मृतांच्या भावांनी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी मृतदेह त्याचा नसल्याचे सांगितले. पत्नीने मृतदेह ओळ्खल्याने पोलिसांनी त्यांना मृतदेह सोपवून त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले.

मृताच्या पत्नीने आपल्या पतीची हत्या झाली असून दोन्ही सख्ख्या भावांचा यात हात असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांची तुरुंगात रवानगी केली. मात्र आता 5 महिन्यानंतर ज्याला मृत समजून अंत्यसंस्कार केले तो ईश्वर राजपूर येथील आपल्या नातेवाईकांकडे पोहोचला तेव्हा सर्वच अवाक झाले. कुटुंबीय त्याला घेऊन पोलीस स्थानकात दाखल झाले.

आता हा सवाल उपस्थित होत आहे की खरपेडा गावात अंत्यसंस्कार केलेला मृतदेह कोणाचा होता? या प्रकरणी गुजरात पोलिसांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी हात झटकले आणि पत्नी व सासरच्या व्यक्तींनी मृताच्या हातावरील ईश्वर नाव पाहून त्याची ओळख पटवल्याचे सांगितले. मात्र आता ईश्वर घरी आल्याने पोलिसांपुढे त्या बेवारस मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याची आव्हान आहे.