
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईकरांच्या पायाला चाके लावलेली असतातच. आता तर त्यांना धावाधाव करण्यास अधिकच बळ मिळणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मध्य रेल्वेची पहिली राजधानी रवाना झाली, तर अलिबाग ते पनवेल ही पॅसेंजर धावणार अशी खूशखबर रेल्वे मंत्रालयाने तीन लाख अलिबागकरांना दिली. एवढेच नव्हे, मेमू ट्रेनचा रोहय़ापर्यंत विस्तार होणार असून पुणे-कर्जत पॅसेंजर पनवेलपर्यंत धावणार आहे. थोडक्यात काय, तर मुंबईकरांच्या पायाची चाके आता टॉप गिअरमध्ये असणार आहेत. याशिवाय आज सीएसएमटी, मुंबई सेंट्रल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 100 फुटी राष्ट्रीय ध्वजासह हायमास्ट दिवे, बेलापूर, तळोजा, प्रभादेवी, माटुंगा रोड, जोगेश्वरी, गोरेगाव, विरार, मालाड येथे पादचारी पूल, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरिवली स्थानकांत लिफ्ट, पश्चिम रेल्वेवर 40 नवीन एटीव्हीएम आदी सुविधांचे लोकार्पण रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
ऑफिसच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव अडगळीत
मुंबईकरांना लोकलमध्ये गर्दीचा सामना करावा लागत असल्याने ऑफिसच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव होता, परंतु हा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला असता त्यास कर्मचाऱयांकडूनच विरोध झाला. अशा लोकोपयोगी कामासाठी आता कर्मचाऱयांनी पुढाकार घ्यायला हवा असे सांगत हा प्रस्ताव अडगळीत गेल्याची कबुली यावेळी रेल्वेमंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.




























































