
राजधानी, शताब्दी किंवा दुरांतो अशा बडय़ा एक्प्रेस गाडय़ांच्या प्रवासासाठी तिकीट काढताना खानपान सेवा घ्यायचा विचार करत असाल तर अशा प्रवाशांना मोठा धक्का बसणार आहे. कारण त्यांना 3 ते 9 टक्के जास्त भाडे द्यावे लागेल. कारण या एक्प्रेसमधील खानपान सेवा आता महागली आहे. हे सुधारित भाडे पुढच्या वर्षी 29 मार्चपासून लागू होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार या एक्प्रेस गाडय़ांमध्ये प्रवाशांना फर्स्ट क्लास एसी आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये चहासाठी 35 रुपये (सध्या 15 रुपये), नाश्त्यासाठी 140 रुपये (सध्या 90 रुपये) तर लंच व डिनरसाठी 245 रुपये (सध्या 140 रुपये) द्यावे लागणार असून सेकंड क्लास एसी, थर्ड क्लास एसी आणि चेअरकार प्रवाशांना सकाळचा चहा 20 रुपये (सध्या 10 रुपये), नाश्ता 105 रुपये (सध्या 70 रुपये), लंच व डिनर 185 रुपये (सध्या 120 रुपये) आणि सायंकाळचा चहा 90 रुपये (सध्या 45 रुपये) द्यावे लागणार आहेत.
























































