उद्यापासून ‘मरे’ची राजधानी आठवड्यातून चार वेळा धावणार

500

मध्य रेल्वेची नाशिकमार्गे धावणारी राजधानी एक्स्प्रेस शुक्रवारपासून आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार अशी चार वेळा धावणार आहे. शुक्रवार, 13 सप्टेंबर रोजी राजधानीसह मध्य रेल्वेच्या विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण होणार आहे. यावेळी रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाच्या तिसर्‍या बेंचचे उद्घाटन होणार असून विविध स्थानकांवरील पादचारी पूल, सरकते जिने, एलईडी इंडिकेटर, मोफत वायफाय सेवेचेही लोकार्पण होणार आहे.

मध्य रेल्वेवर 27 वर्षांनी सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन अशी पहिली राजधानी जानेवारीपासून सुरू करण्यात आली. यापूर्वी ही गाडी बुधवार आणि शनिवार अशी आठवड्यातून दोन वेळा धावायची. नुकतेच या गाडीला डबल इंजिन लावून तिच्या वेगात वाढ करण्यात आली आहे. मध्य रेल्वेची राजधानी महाराष्ट्रातून जात असल्याने तिला पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर रोज चालविण्याची मागणी होत होती. आता पश्चिम रेल्वेने तिच्याकडील एक रेक मध्य रेल्वेला दिल्याने मध्य रेल्वेची राजधानी आठवड्यातून चार वेळा धावण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने मुंबईतीलच नव्हे तर नाशिक, जळगाव आणि भोपाळमधील प्रवाशांचा फायदा होणार आहे.

रेल्वे अपघात लवादाचे दुसर्‍या बेंचचे उद्घाटन

उपनगरीय लोकल प्रवासात रोज सरासरी दहा प्रवाशांचा मृत्यू होत असतो, तर वर्षाला हा आकडा तीन ते साडेतीन हजारांपर्यंत पोहचतो. त्यामुळे मुंबईतील रेल्वे अपघात दावा लवादाकडे नुकसानभरपाईसाठी आलेल्या दाव्यांचा ढीग पडला असून असे सहा हजारांहून अधिक दावे निकालाअभावी प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठी सीएसएमटीला पी. डिमेलो रोडजवळ लवादाचे एकच बेंच असून आणखी एका बेंचची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या