‘नवाज शरीफांसोबत चर्चा होते मग हार्दिक पटेल सोबत चर्चा का नाही?’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगेश पाटील । हिंगोली

‘निमंत्रण नसताना देखील पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफ यांच्यासोबत चर्चा केली जाते. मग हार्दिक पटेल सोबत चर्चा का केली जात नाही?’, असा सवाल काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी मोदी सरकारला बुधवारी अहमदाबाद येथे केला. गुजरात राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी 25 ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेले पाटीदार समाजाचे युवानेते हार्दिक पटेल यांच्या अहमदाबाद येथील उपोषणस्थळी काँग्रेस गुजरात राज्य प्रभारी तथा हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी बुधवारी भेट दिली. हार्दिक पटेल यांच्या प्रकृतीची सातव यांनी चौकशी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार राजीव सातव म्हणाले की, ‘हिंदुस्थान हा लोकशाही प्रधान देश आहे. प्रश्न आणि समस्यांवर सरकारने चर्चा केली पाहिजे. हार्दिक पटेल यांच्या प्रकृती स्वास्थाविषयी आम्ही चिंतित आहोत. शेतकऱ्यांना गुजरातमध्ये कर्जमाफी मिळावी या मागणीसह आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हार्दिक पटेल यांच्यासोबत चर्चा करायला हवी’, अशी मागणी खासदार सातव यांनी केली. मात्र या सरकारला कोणाचे ऐकूनच घ्यायचे नाही असा आरोपही त्यांनी केला. या भेटीच्या वेळी गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी यांच्यासह काँग्रेसचे आमदार व नेते उपस्थित होते.