
उदय जोशी, बीड
विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला राम राम ठोकणारे राजेंद्र म्हस्के हे भाजपमध्येच जाणार अशी काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात चर्चा सुरू होती. त्यांची भाजपशी वाढलेली सलगी आणि त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय यामुळे ही चर्चा खरी होतेय असं वाटायला लागलं असतानाच म्हस्के यांनी पुन्हा एकदा राजकीय पंडितांना धक्का दिला आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन परळीत भाजपाने एक बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपा आमदारांसह राजेंद्र मस्के सुद्धा उपस्थित होते. सोमवारी म्हस्केंनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले. म्हस्के हे आजच्या बैठकीनंतर भाजपा प्रवेशाची घोषणा करतील असे अनेकांना वाटत होतं मात्र राजेंद्र मस्के यांनी भाजपाला ठेंगा दाखवला, भाजपात तूर्तास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मित्रमंडळाच्या माध्यमातून राजकीय व्यासपीठ निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे,
लोकसभा आणी विधानसभा निवडणुकांपूर्वी बीड जिल्ह्यात बरीच राजकीय उलथापालथ होत आहे. या उलथापालथीमध्ये महत्वाकांक्षी राजेंद्र म्हस्के यांचंही नाव समाविष्ट झालं होतं. मात्र म्हस्के यांनी आपले पत्ते अजूनही उघड केले नसून आपण भविष्यात काय करणार आहोत याबद्दल कोणालाही थांगपत्ता लागू न देण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसतंय.

























































