
ज्या मतदाराच्या जीवावर रंकाचा राजा होतो.. तोच पुढे त्या मतदाराला विसरतो.. पण नांदेड जिह्यातील भाजपचे आमदार राजेश पवार मात्र याला अपवाद आहेत. आमदार पवार यांनी गावात येण्याची विनंती करणाऱ्या मतदाराचा थेट बापच काढला. एवढेच नाहीतर त्याला कोरोना होईल असा शापही दिला. आमदार राजेश पवार यांच्या या असभ्य शिवीगाळीची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाला असून ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नायगाव तालुक्यातील नावंदी येथील मोहनलाल ठाकूर यांनी आमदार राजेश पवार यांना फोन करून एकदा गावाला भेट देण्याची विनंती केली. कोरोनामुळे आपल्याला येणे शक्य झाले नसेल पण आता येऊन आमचे प्रश्न समजून घ्या, असे आर्जव ठाकूर यांनी केले. त्यावर आम्हाला सरकारने कुठेही जाऊ नका असे सांगितले आहे असे आमदार राजेश पवार म्हणाले. त्यानंतर मोहनलाल ठाकूर यांनी पुन्हा येण्याचे आर्जव केले. त्यावर आमदार पवार भयंकर संतापले. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले. त्यामुळे मोहनलाल ठाकूर यांनी साहेब गावात येऊ देऊ नका, पण शिव्या देऊ नका असे म्हटले. त्यानंतर आमदार पवार पुन्हा भडकले, ‘गाव तुझ्या बापाचा आहे काय? तू गावाचा मालक आहेस का? अशी उद्दाम भाषा वापरली. एवढेच नाही तर तुला कोरोना होईल असा थयथयाटही केला.
आमदार राजेश पवार यांच्या उद्दाम भाषेची ऑडिओ क्लिप जिल्हाभरात व्हायरल झाली आहे. आदर्श शिस्तीचे वस्तूपाठ देणाऱ्या भाजपने मतदाराला कोरोना होईल असे शिव्याशाप देणाऱ्या आमदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


























































