नाटकाची संहिता महत्त्वाची! : राजेश शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रतिनिधी

लेखक–दिग्दर्शक राजेश शिंदे हे नाटकाच्या संहितेलाच आदर्श मानतात.

नाटक प्रेक्षकांच्या मनाला भिडलं पाहिजे. ते तसं भिडलं तरच ते यशस्वी होतं. म्हणजेच नाटकाची संहिता महत्त्वाची असते. मग ती कुणीही लिहिलेली असली तरी आपल्याला फरक पडत नाही, असं स्पष्ट मत लेखक-दिग्दर्शक राजेश शिंदे व्यक्त करतात. ई नाटय़शोध एकांकिका स्पर्धेत त्यांच्या ‘अडम तडम’ नावाच्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले. ते म्हणतात, चांगले साहित्य ते मी आदर्श मानतो. म्हणजे एखादा लेखक वगैरे व्यक्तीला मी आदर्श मानूच शकत नाही. जे लेखन चांगले आहे त्या लेखनाला मी आदर्श मानतो. संहिता माझ्यासाठी महत्त्वाची… ती माझ्या ज्युनियरनेही लिहिलेली असली तरी ती माझ्यासाठी आदर्श आहे.

आपल्याबाबत बोलताना ते म्हणाले, रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझा नाटकांशी संबंध आला. ‘नाटय़वलय’मध्ये त्यावेळी दोन तीन वर्षे अभिनय केला. पासआऊट झाल्यानंतर मी लिखाणाला सुरुवात केली. लेखनासोबतच दिग्दर्शनही करायला लागलो. मी बहुतांश एकांकिकांमध्येच रमतो. कारण त्यात थोडय़ा अवधीत आपला विषय छान मांडता येतो. दोन अंकी नाटकंही मी करू शकतो. नाही असं नाही, पण एकांकिका करायला मला आवडतात. त्या करायला जास्त मजा येते.

ई नाटय़शोध एकांकिका स्पर्धेत राजेश यांच्या ‘अडम तडम’ या एकांकिकेला पहिले पारितोषिक मिळाले. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ही एकांकिका मुळात लेखक सुधीर सुखटणकर यांच्या एका कथेवरून आम्ही घेतला. या पूर्ण कथेवरूनही नाही, त्यातला एक मुद्दा आम्ही उचलला. एका माणसाला मेरीटमध्ये यायची इच्छा होती. ते त्यांना येता आलं नाही. त्यामुळे त्यांनी आपली स्वप्नं मुलांवर लादण्याचा प्रयत्न केला. पहिल्या मुलाकडून ते स्वप्नं पूर्ण होऊ शकलं नाही तेव्हा त्यांना कळलं की मुलीच मेरीटमध्ये पहिल्या येतात. तेव्हा त्यांनी आपण मुलगी जन्माला घालायची असं ते ठरवतात. पण पुन्हा त्यांना मुलगाच होतो. मग मुली पहिल्यापासूनच हुशार असतात असं कळल्यामुळे ते या दुसऱ्या मुलाला मुलीप्रमाणे वाढवतात. का… तर तो मेरीटमध्ये यावा म्हणून! मुलीसारखं वागवून हा मुलगा मोठा होतो. मेरिटमध्ये पहिलाही येतो. आता हा माणूस त्याला सांगतात आता तू मुलासारखं वागायला लाग. येथे एकांकिका गंभीर होते. कारण इतकी वर्षे गुपचूप पाहणारी या मुलाची आई आपल्या पतीला सुनावते. तुम्ही कसे चुकलात ते सांगते. पण शेवट गंभीर न करता आम्ही विनोदी पद्धतीनेच केला आहे.