हिंदी विरोधी राजकारणात सुपरस्टार रजनीकांतची उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची भाषा हिंदी असली पाहिजे असे विधान केले होते. त्यावरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. अमित शहांच्या या भुमिकेला आधी कमल हसन यांनी विरोध केला होता. आता सुपरस्टार रजनीकांत यांनीही या वादात उडी घेतली आहे. तमिळनाडूवर कोणीच हिंदी भाषा लादू शकत नाही असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.

चेन्नई विमानतळावर माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, “तमिळनाडूचे नव्हेते तर दक्षिणेतल्या कुठल्याही राज्यात हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही. फक्त हिंदीच नव्हे तर कुठलीही भाषा लादता कामा नये. देशात एखादी संपर्क भाषा असणे चांगले आहे परंतु कुठलीही भाशा लादणे अस्विकारार्ह आहे.”

हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की हिंदी आपली राजभाषा आहे. देशात एक भाषा असली पाहिजे असेही अमित शाह म्हणाले होते. शाह यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. याचा विरोध केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. तसेच कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही शाह यांच्या विधानाला विरोध दर्शवला होता.