
ऑपरेशन सिंदूर हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून तो आमचा निर्धार आहे. त्यात केवळ आम्ही संरक्षण करत नाही तर गरज पडल्यावर कठोर निर्णयही घेतो. दहशतवाद्यांनी धर्म विचारून आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसले. आम्ही त्यांचे कर्म पाहून बदला घेतला आणि त्या दहशतवाद्यांना संपवले, अशी गर्जना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. त्यांनी आज श्रीनगर येथील बदामी छावणीला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
पाकिस्तानने दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर थांबवावा. अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रs सुरक्षित राहतील का? असा माझा सवाल असून पाकिस्तानची अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.