सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तणावमुक्त राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुपरस्टार रजनीकांत यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयातून रविवारी घरी सोडण्यात आले आहे. रक्तदाबाचा त्रास होत असल्याने शुक्रवारी रजनीकांत यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, रजनीकांत यांनी तणावमुक्त राहवे आणि कोणतेही दडपण घेऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचे सर्व वैद्यकीय अहवाल चांगले आहेत, त्यात चिंताजनक काहीही नाही. त्यांच्या रक्तदाबात सारखे बदल होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या वैद्यकीय अहवालात चिंताजनक काहीही नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टरांनी रविवारी रजनीकांत यांची आरोग्य तपासणी करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. मात्र, रजनीकांत यांनी कोणताही तणाव घेऊ नये, अतिविचार टाळावेत, शांत राहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

तामिळ चित्रपट ‘अन्नाथे’ च्या चित्रीकरणासाठी रजनीकांत 13 डिसेंबरपासून हैदराबादमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रीकरण पथकातील चारजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रजनीकांत विलगीकरणात होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.