‘पोलिसांनी वेळकाढूपणा केला नसता, तर रकबर वाचला असता’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जयपूर

राजस्थानातील अलवर मॉब लिंचिंग प्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी प्रथमच मत व्यक्त केले आहे. पोलिसांनी वेळकाढूपणा केला नसता तर रकबरला वाचवता आले असते, असे विधान करत त्यांनी पोलिसांनी वेळ वाया घालवल्याचे मान्य केले आहे. गाईला गोशाळेत नेण्याऐवजी रकबरला रुग्णालयात नेले असते तर त्याचा जीव वाचला असता असे ते म्हणाले. कटारिया यांनी जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रकबर उर्फ अकबरच्या कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.सरकारने आतापर्यंत केलेल्या कारवाईबाबत रकबरचे कुटुंबीय समाधानी असल्याचे कटारिया यांनी सांगितले. त्यांना कधीही कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर ते आपल्याकडे येऊ शकतात, असेही ते म्हणाले.

रकरबरचा शवविच्छेदन अहवाल मंगळवारी पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या शरीरावर झालेल्या जखमा आणि मानसिक धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलीस पथकाची चूक असल्याचे दिसून येत आहे, असे राजस्थानचे कायदा आणि सुव्यवस्थेचे विशेष डीजी एन.आर. के. रेड्डी यांनी सोमवारी सांगितले होते. पोलिसांनी योग्य निर्णय घेतला असता तर रकबरला वाचवता आले असते, असेही ते म्हणाले.

गोतस्करीच्या संशयावरून शुक्रवारी जमावाने केलेल्या मारहाणीत रकबरचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी रकबरला वेळेत रुग्णालयात पोहचवले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. जमावाच्या मारहाणीत रकबरचा मृत्यू झाला नसून पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा दावा आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केला आहे. तसेच रकबर गोतस्कर नव्हता, तर चोरांसारखे रात्री लपून का जात होता. तसेच गावातील लोकांनीच त्याला मारहाण केली आहे. कोणत्याही कारणाशिवाय ते मारहाण का करतील असा सवालही त्यांनी केला आहे.