मैदानातील सरावाची कमतरता जाणवतेय, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांची खंत

204

कोरोना व लॉकडाऊनचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून खेळाडूंच्या सराकाला परवानगी देण्यात आली असली कोरोनाचा प्रार्दुभाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे सांघिक सराव आणि प्रत्यक्षात स्पर्धा केव्हा सुरू होतील याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या रोलबॉल या खेळालाही याच नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. या खेळाचे जनक व आंतरराष्ट्रीय रोलबॉल फेडरेशनचे सचिव राजू दाभाडे यांच्याशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या कालावधीत ऑनलाईन मार्गदर्शन सुरू आहे. मात्र खेळाडूंना प्रत्यक्षात मैदानात जायला मिळत नाही. याचीच कमतरता प्रकर्षाने जाणवतेय. मात्र महाराष्ट्र सरकारच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपण कोरोनाचे संकट दूर करू शकतो.

महाराष्ट्र सरकारने रोलबॉलमधील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे
रोलबॉल या खेळाला आता क्रीडा विभागाकडून विशेष मान्यता देण्यात आली आहे. हा खेळ आता तब्बल 60 देशांमध्ये खेळला जातोय. या खेळांतील खेळाडूंना उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, तामीळनाडू या राज्यांत पुरस्कार, स्कॉलरशिप दिली जाते. पण महाराष्ट्रात अद्याप हे झालेले नाही. महाराष्ट्र सरकारने रोलबॉलमध्ये खेळणाऱया खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे राजू दाभाडे यांना वाटते.

स्पर्धांचा कालावधी गेला
एप्रिल ते जून या कालावधीत रोलबॉलच्या स्पर्धा होतात. पण याच कालावधीत कोरोनाचे संकट वाढत गेले. त्यामुळे एकही स्पर्धा झाली नाही. पण युरोपमध्ये स्पर्धा सुरू होताहेत. अमेरिकाही त्याच वाटेवर आहे. आपल्या येथेही सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धा सुरू होऊ शकतात. सुरूवातीला प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवाव्या लागतील, असे राजू दाभाडे यावेळी म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिबिराचे आयोजन
लॉकडाऊनमध्ये आम्ही युवा खेळाडूंसाठी रोलबॉलशी निगडीत ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. याचद्वारे खेळाडूंना जाणवणाऱया समस्याही सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढेच नव्हे तर रेफ्रीसाठी परीक्षांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते, असे राजू दाभाडे यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या