
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱयांना तातडीने मदत करावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
अतिवृष्टी नव्हे, तर ठिकठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे महाराष्ट्रात शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पिके चांगली आली होती. पिके कापणीच्या वेळी पाऊस झाल्याने सोयाबीन, कांदा, कापूस, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण कोलमडला आहे. शेतकऱयाला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. राज्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 35 हजार कोटी रुपये केंद्राने, तर 15 हजार कोटी रुपये राज्य सरकारने देऊन शेतकऱयांना न्याय द्यावा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी शेतकऱयांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱयांना न्याय मिळेल, याची मला खात्री आहे. मात्र, केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्नभावाची वागणूक कायम देत आहे. केंद्र सरकारने बिहारला ज्या पद्धतीने तातडीने मदत दिली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही राष्ट्रीय आपत्ती फंडातून मदत करावी, राज्यातील भाजपच्या नेत्यांनी तशी मागणी करावी, असेही ते म्हणाले.





























































