सात लाख भाविक राजुरेश्वराच्या चरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। राजूर

अंगारकी चतुर्थीसाठी सोमवारी जालना जिल्ह्यातील राजुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यातून जवळपास सात लाख भाविकांनी हजेरी लावली. राजुरेश्वर साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असून नवसाला पावणारा गणपती म्हणून राजुरेश्वराची ओळख आहे. मंगळवारी येणाऱ्या या अंगारिका चतुर्थीला येथे विशेष महत्व आहे. त्या अनुषंगाने लाखो भाविक दर्शनासाठी येतात. काल सायंकाळी 10 वाजेपासूनच भाविकांचे जत्थेच्या जथ्थे राजूरात दाखल होत होते. तसेच अनेक ठिकाणाहून दिंड्यामध्ये देखील भाविक येत होते. रात्री 12 वाजता मंत्रोच्चाराच्या गजरात राजुरेश्वरची महापूजा करण्यात आली. यावेळी पहिल्या दर्शनाचा मान कन्नड तालुक्यातील वासडी येथील निर्मलाबाई पंढरीनाथ
निकम यांना मिळाला. यावेळी निर्मला रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, भोकरदन तहसीलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी कैलास पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग,,भगवान नागवे,प्रशांत दानवे, व्यवस्थापक गणेश साबळे,श्रीरामपंच पुंगळे, राहुल दरक, विनोद डवले, मोहिनीराज मापारी यांची उपस्थिती होती. निकम दांम्पत्याला राजुरेश्वर गणपती संस्थांनच्यावतीने त्यांना शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक भाविकांचे राजुरेश्वरावर श्रद्धा असल्याने पायी येणाऱ्या या भाविकांची संख्या लक्षणीय होती. या वर्षातील शेवटची चतुर्थी असल्याने भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात दिसून आली. नको देवा सोन्याचांदीच दान रे, भिजव सार तहानलेले रान रे …असे साकडे भाविकांनी गणरायाला असे साकडे भाविकांनी गणरायाला घातले.

राजुरेश्वराला नतमस्तक होण्यासाठी जालना,अंबड, मंठा-परतूर, बदनापूर, देऊळगाव राजा, सिल्लोड,भोकरदन, जाफराबाद, फुलंब्री, संभाजीनगर, अजिंठा, कन्नड, घनसावंगी यासह मराठवाड्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.

यावेळी पायी जत्थेच्या जत्थे राजुरेश्वर भगवान की जय, गणपती बाप्पा मोरया.., अशा गगनभेदी घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी अनेकभाविकांच्या दिंड्यांनी भजन, गौळणी, अभंगाच्या गजरात परिसर दणाणून टाकला. यावेळी जालना येथील जनकल्याण रक्तपेढी,संभाजीनगर येथील समर्थ रक्तपेढी यांच्या वतीने मंदिरावर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले होते. यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. राजुरेश्वरावर अपार श्रद्धा असणारे अनेक मान्यवरांनी देखील राजूर गाठत राजुरेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.