
राज्यसभेमध्ये आज ड्रग्जविरोधी विधेयकासंदर्भात चर्चा सुरू असताना बोलताना अडवल्यामुळे आणि वैयक्तिक टिप्पणीमुळे भडकलेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी थेट केंद्रातील भाजप सरकारला शाप दिला. कोणीही माझ्यावर भर राज्यसभेत वैयक्तिक टिप्पणी कशी काय करू शकते. मी तुम्हाला शाप देते की, तुमचे वाईट दिवस लवकरच येतील, अशी शापवाणी जया यांनी केली.
राज्यसभेमध्ये आज ड्रग्जविरोधी विधेयकासंदर्भात चर्चा सुरू झाली. या विधेयकावरील चर्चेवर बोलण्यासाठी जया बच्चन यांना वेळ देण्यात आली होती. मात्र, या विषयावर न बोलता त्यांनी थेट 12 निलंबित खासदारांच्या मुद्दय़ावरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली. त्यांना सभापतींनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान, भाजप खासदार जुगल लोखंडवाला यांनी ड्रामा करू नका, अशी टिप्पणी केल्यामुळे त्या भडकल्या. ते माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी कशी करू शकतात? ही फार वाईट बाब आहे की, तुमच्यामध्ये थोडाही सेन्स नाही आणि बाहेर बसलेल्या आपल्या सहकाऱयांबाबत थोडाही सन्मान नाही, असे त्या म्हणाल्या.
खासदारांच्या निलंबनावरून गदारोळ कायम
राज्यसभेतून निलंबित केलेल्या 12 खासदारांचे निलंबन सरकार हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवडय़ात तरी मागे घेईल ही शक्यता किमान आजच्या दिवसापुरती तरी फोल ठरली. निलंबित खासदारांच्या संदर्भात सरकारने निवडक राजकीय पक्षांच्या नेत्यांना बैठकीला बोलावून विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. दरम्यान, याच मुद्दय़ावरून राज्यसभेतील कामकाज बाधित झाले.



























































