राम मंदिर आंदोलनातील नेते डॉ. रामविलास वेदांती यांचे निधन

राम मंदिर आंदोलनातील नेते संत आणि माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती (67) यांचे मध्य प्रदेशातील रिवा येथे आज निधन झाले. त्यांचे पार्थिव अयोध्या येथे नेण्यात येत असून तेथे त्यांना मंगळवारी सकाळी 10 वाजता जलसमाधी देण्यात येईल.

रिवा येथे रामकथा सादर करत असताना त्यांची प्रकृती बिघडली. ते रुग्णालयात दाखल होते. त्यांना आज एअरलिफ्ट करून भोपाळ येथील एम्समध्ये नेण्याची तयारी होती. मात्र एअर ऍम्ब्युलन्स दाट धुक्यामुळे रिवा येथे उतरू शकली नाही. त्यानंतर काही वेळाने वेदांती यांची प्राणज्योत मालवली. डॉ. वेदांती यांचे उत्तराधिकारी महंत राघवेश दास वेदांती यांनी सांगितले की, मंगळवारी अयोध्या येथील हिंदू धामपासून राम मंदिरापर्यंत डॉ. वेदांती यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यानंतर शरयू नदीच्या तटावर त्यांना जलसमाधी देण्यात येईल. प्रतापगड आणि मछलीशहर येथून ते खासदार होते. राम मंदिर आंदोलनाला गती दिल्यामुळे त्यांना राम मंदिर जन्मभूमी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष पद सोपवले होते.