निकाल लागून महिना उलटला, राममंदिर ट्रस्टची अजूनही स्थापना नाही!

569

राम जन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन महिनाभराहून अधिक काळ लोटला तरीही राममंदिर उभारण्यासाठी राममंदिर ट्रस्टची स्थापना होऊ शकली नाही. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोण बसणार यासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात अनेक अडचणी येत असल्याने ट्रस्टची स्थापना झालेली नाही. शंकराचार्यांपासून ते आरएसएसच्या पदाधिकाऱयांपर्यंत तसेच अनेक नेत्यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. दरम्यान, ट्रस्टची रूपरेषा, कार्यविभागणी आणि इतर गोष्टींबाबत विचारविमर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

तीन महिन्यांत  ट्रस्ट स्थापन करावी लागणार

केंद्र सरकारला तीन महिन्यांच्या आत ट्रस्ट स्थापन करावी लागणार आहे. ट्रस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सल्लागार म्हणून काम करतील. दरम्यान, कार्यकारिणीच्या सदस्यांबाबत अजूनही पेचप्रसंग आहे. ट्रस्टमध्ये मंदिर निर्माणसाठी वेगळी समिती असेल. यात 7 ते 9 सदस्यांचा समावेश असेल. या समितीवर राममंदिर बांधण्यासाठीची संपूर्ण जबाबदारी असेल, असेही विहिंपमधील सूत्रांनी म्हटले आहे.

ट्रस्टमध्ये अनेक दावेदार

ट्रस्टच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने अनेक बैठका घेतल्या आहेत. अनेक बैठकांना गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते, परंतु ट्रस्टला अंतिम स्वरूप मिळू शकले नाही. ट्रस्टच्या अध्यक्षपदावर दावा सांगणाऱयांची यादी लांबलचक आहे. यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्याही नावाची चर्चा आहे. मंदिराची उभारणी, त्यासाठी आवश्यक निधी, प्रशासन, पूजाअर्चा यांसह विविध बाबींवर ट्रस्टच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन लागण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून तयार करण्यात येणारी ही सर्वात मोठी ट्रस्ट असेल. ट्रस्टची स्थापना केल्यानंतरच राममंदिर बांधण्यात येणार आहे. 1882 च्या ट्रस्ट कायद्यांतर्गत नोंदणी करून ट्रस्टची स्थापन करण्यात येणार आहे, मात्र अशाप्रकारे ट्रस्ट स्थापन केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात असे विश्व हिंदू परिषदेतील काही सूत्रांनी म्हटले आहे. संसदेच्या माध्यमातून ट्रस्ट तयार केल्यास अडचणी येणार नाहीत. केंद्र सरकार संसदेत विधेयक आणून ट्रस्ट स्थापन करण्यासाठी 14 जानेवारीनंतर विशेष अधिवेशन लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या