
देशभरासह अयोध्येत राम नवमीचा सण दरवर्षी मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा केला जातो. यंदा राम नवमी उद्या २१ एप्रिलला आहे. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे. पण, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदा रामनवमी भाविकांशिवाय मंदिरात केवळ पूजाअर्चापर्यंत मर्यादित राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या २४ तासांत अयोध्येत एकूण २०० कोरोना संक्रमित लोक सापडलेआहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १,३११ वर पोहोचली आहे. गेल्यावर्षी २०२० मध्येही लॉकडाऊनमुळे राम नवमीचे कार्यक्रम होऊ शकले नव्हते. अयोध्येत राम नवमीचा भव्य उत्सव होत नसलेले हे सलग दुसरे वर्ष आहे.
राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले, ‘खूप मर्यादित लोक श्रीरामाच्या दर्शनासाठी येथे येत आहेत. आणि त्यांना ५-५ च्या तुकड्यांमध्ये प्रवेश दिला जात आहे. सामाजिक अंतर आणि मास्क लावणे अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत राम नवमीचा उत्सव केवळ औपचारिकपणे साजरा केला जाईल.’
राम नवमीविषयी महंत राज कुमार दास म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लोकांनी त्यांच्या घरातच राहून राम नवमीचा सण साजरा करावा. तर, जिथे श्रीरामाची पूजाअर्चा असेल, तिथेच अयोध्या आहे, असे आवाहन महंत मैथिली शरण यांनी केले आहे.
अयोध्याचे एसएसपी शैलेश पांडे म्हणाले की, ‘जे भाविक कोविड-१९ चा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येतील, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. अयोध्याच्या सीमांवर बंदी घातली जाईल.’
अयोध्या परिसर विकास योजनांवरही परिणाम
राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर अयोध्याला पर्यटनाच्या नकाशावर ठेवण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या. परंतु, कोरोनामुळे त्या सर्वांवर परिणाम झाला आहे. अयोध्या बसस्थानक, कोरियन क्वीन्स पार्क, एनएच२७ चा सहापदरी महामार्ग, अयोध्याभोवती रिंगरोडचे बांधकाम, अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम, सुमारे १२०० एकर परिसरात नवीन अयोध्येचे बांधकाम आदी प्रकल्पांवर सध्या धिम्या गतीने काम सुरू आहे.
प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्याचा प्रकल्प रेंगाळला
अयोध्येत शरयू नदीच्या काठावर २५१ मीटर उंचीची प्रभू श्रीरामाची जगातील सर्वांत उंच प्रतिमा उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अद्यापि सुरू झालेले नाही. दीपोत्सवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ४ वर्षांपूर्वी याची घोषणा केली होती. गेल्या दोन वर्षांत अयोध्येत बऱ्याच विकास योजना सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी अनेकांचे काम थंडावले आहे.




























































