
एकीकडे नामांतराची चर्चा सुरू असतानाच नगर जिल्ह्याच्या विभाजनावरून भाजप आमदारांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्ह विभाजन नको असल्याचे विधान केले होते. या उलट आमदार राम शिंदे यांनी मात्र नगरचे जिल्हा विभाजन झाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.
नगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आपण जिल्हा विभाजनाचा विषय घेतलेला होता व त्याला अंतिम स्वरूपही सुद्धा आलेले होते. त्यावेळेला विरोधी पक्षांमध्ये असलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे सुद्धा त्याच्याशी सहमत होते. कालांतराने हा विषय प्रलंबित राहिला, असे राम शिंदे म्हणाले. जिल्हा विभाजन झालेच पाहिजे या मतावर मी ठाम असून हे होत असताना दुसरीकडे नामांतराचा विषय सुद्धा मार्गी लागला पाहिजे, असेही ते म्हणाले.
पंकजा मुंडेंना योग्य तो सन्मान पक्ष देईल
माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे काम अतिशय चांगले आहे. माझा पराभव झाला तसा त्यांचाही पराभव झाला, पण पक्ष याची दखल घेत असतो. त्यांना सुद्धा केंद्रीय समितीवर स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणी नाराज आहे-नाही असे नाही. त्यांना योग्य तो सन्मान पक्ष देईल असेही राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.



























































