‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये प्रेक्षकांना भूरळ पाडणारा निसर्ग कोपला! गजबजलेल्या धरालीत स्मशान शांतता 

हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड हे एक अतिशय सुंदर डोंगराळ राज्य आहे. येथील वाहत्या नद्या, उंच पर्वत, तलाव आणि धबधबे तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना आकर्षित करतात. धराली नुकत्याच झालेल्या आपत्तीमुळे चर्चेत आहे. एकेकाळी हर्षिल, धराली 1985 मध्ये आलेल्या एका चित्रपटाद्वारे पर्यटन क्षेत्रात अमर झाले.

राज कपूर यांच्या प्रतिष्ठित चित्रपट ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाचे शूटिंग उत्तरकाशीच्या हर्षिल व्हॅलीमध्ये चित्रित करण्यात आले होते. त्या काळात या भागातील नैसर्गिक सौंदर्याने राज कपूर यांना केवळ मंत्रमुग्ध केले नाही तर चित्रपटानंतर देश-विदेशातील पर्यटकांनाही आकर्षित केले.

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाने केवळ त्याच्या कथेने प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत. तर जगभरात हर्षिलच्या नैसर्गिक सौंदर्याला ओळख मिळवून दिली. राज कपूर या परिसराच्या सौंदर्याने इतके प्रभावित झाले की, त्यांनी चित्रपटातील अनेक महत्त्वाचे दृश्ये येथे चित्रित केली.

चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध दृश्य अभिनेत्री मंदाकिनी धबधब्याखाली आंघोळ करताना दिसते, ते हर्षिलमध्येच चित्रित करण्यात आले होते. या धबधब्याचे नंतर मंदाकिनी धबधबा असे नाव देण्यात आले. एवढेच नाही तर ‘हुस्न पहाडों का’, ‘ओ साहिबा’ सारखी सुपरहिट गाणी देखील हर्षिलच्या खोऱ्यात चित्रित करण्यात आली आहेत. या गाण्यात बर्फाळ शिखरे, घनदाट जंगले आणि भागीरथी नदीचा प्रवाह सुंदरपणे दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील गंगोत्री यात्रेशी संबंधित अनेक प्रेमकथा आणि दृश्ये हर्षिल आणि धरालीभोवती चित्रित करण्यात आली आहेत.

चित्रपटातील काही दृश्ये हर्षिलमधील हिंदुस्थान -चीन सीमेवर असलेल्या, शेवटच्या पोस्ट ऑफिसभोवती देखील चित्रित करण्यात आली होती. त्या दृश्यात अभिनेत्री मंदाकिनी पत्राची वाट पाहत असे. पर्यटकांना हे पोस्ट ऑफिस कळावे यासाठी प्रशासनाने ‘राम तेरी गंगा मैली’मधील एका दृश्याचे पोस्टर देखील लावले. हे पोस्ट ऑफिस अजूनही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे येणारे पर्यटक अजूनही हिंदुस्थान -चीन सीमेवरील पोस्ट ऑफिस पाहण्यासाठी येतात.