रामायण पुन्हा सुरू होणार म्हणून सोनाक्षी सिन्हा होतेय ट्रोल!

8378

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ट्रोल होणाऱ्यांच्या यादीत सेलिब्रिटींचा नंबर सर्वात वरचा असतो. सतत एका स्कॅनरखाली वावरताना त्यांच्या कळत नकळत झालेल्या चुका नेटकरी बरोबर हेरतात आणि त्यांना ट्रोल करतात. पण, काही सेलिब्रिटी आपल्या वागणुकीनेच नेटकऱ्यांच्या हातात आयतं कोलीत देतात आणि फसतात. अशाच प्रकारे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही काही दिवसांपूर्वी रामायणावरून ट्रोल झाली होती.

आता पुन्हा एकदा सोनाक्षी ट्विटरवर ट्रोल होताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे यावेळीही कारण रामायण हेच आहे. काही काळापूर्वी कौन बनेगा करोडपती या रियालिटी शोमध्ये सोनाक्षीने विशेष अतिथी म्हणून स्पर्धकाची मदत करण्यासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी स्पर्धकाला एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न होता, हनुमानाने संजीवनी कुणासाठी आणली या प्रश्नावर सोनाक्षीने सुरुवातीला ‘मला वाटतं सीता आणि रामासाठी संजीवनी आणली गेली असावी, असं उत्तर दिलं. पण, शेवटी लक्ष्मण या योग्य उत्तरावर ठाम राहत तिने बक्षिसाची रक्कम जिंकली.

पण, सीतेसाठी संजीवनी आणण्याच्या तिच्या तर्काने तिने नेटकऱ्यांच्या हातात आयतं कोलीत दिलं आणि नेटकऱ्यांनी तिची हुर्यो उडवायला सुरुवात केली. #YoSonakshiSoDumb असा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड झाला होता. या घटनेला आता सहा सात महिने होऊन गेले आहेत. पण, गप्प बसतील ते नेटकरी कसले? माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 28 मार्चपासून रामायण पुन्हा सुरू होणार असं जाहीर केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा सोनाक्षीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मागच्या वेळी चुकीचं उत्तर दिलं होतं, पण आता तरी सोनाक्षीने रामायण बघावं आणि माहिती करून घ्यावी, अशा अर्थाची अनेक ट्वीट्स व्हायरल होत असून ट्विटरवर सोनाक्षीच्या नावाचा ट्रेंडही सुरू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या