‘रामायण’ मालिकेचा विश्वविक्रम, जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून नोंद

6276

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ या मालिकेचे दूरदर्शनवर पुनःप्रसारण करण्याचा निर्णय झाला. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता सुरू केलेल्या या मालिकेमुळे दूरदर्शनचा टीआरपी प्रचंड वाढला. रामायण मालिकेने आधी 2015 पासून सर्वाधिक टीआरपी मिळणारा कार्यक्रम म्हणून विक्रम केला आणि आता जगातील सर्वाधिक पाहिला जाणार कार्यक्रम म्हणून विश्वविक्रम केला आहे. दूरदर्शनने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच लोक घरात अडकून पडले आहेत. लोकांना घरातच खिळवून ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू केलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ही मालिका पाहण्यासाठी जुन्या पिढीसह नवीन पिढीचे लोकही टीव्हीसमोर बसलेले दिसत आहे. आता या मालिकेने नवा विश्वविक्रम केला आहे.

दुरदर्शनने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. ‘विश्वविक्रम. दूरदर्शनवरील ‘रामायण’ या मालिकेने जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा विक्रम मोडला आहे.  16 एप्रिलला या कार्यक्रमाची सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून नोंद झाली. 7.7 कोटी लोकांनी हा कार्यक्रम पाहिला’, असे ट्विट दूरदर्शनने केले आहे. यासह एकाच दिवशी सर्वाधिक पाहिला गेलेला कार्यक्रम म्हणून ‘रामायण’ मालिकेची नोंद झाली.

दरम्यान, रामायण या मालिकेसह महाभारत, शक्तिमान, फौजि, सर्कस, चाणक्य, देख भाई देख, श्रीमान श्रीमती या मालिकांचे पुनःप्रसारण होत आहे. लवकरच ‘श्रीकृष्ण’ ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे दूरदर्शनचा टीआरपी आणखी वर जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या