क्रिकेटपटूंना सुपरस्टार बनवणाऱया संस्कृतीने खेळाची वाट लावलीय, रामचंद्र गुहा यांचे परखड मत

हिंदुस्थानात क्रिकेट हा खेळ पहिल्या क्रमांकाचा खेळ. यामध्ये खेळणारे क्रिकेटपटू म्हणजे देवच. पण याच सुपरस्टार, देवत्व बहाल करण्यात येणार्या खेळाडूंच्या संस्कृतीने खेळाचीच वाट लावलीय. दिग्गज इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान आपले परखड व स्पष्ट मत व्यक्त केले. निमित्त होते त्यांच्या ‘द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट’ या नव्या पुस्तकाचे.

रामचंद्र गुहा यावेळी म्हणाले, कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक अनिल पुंबळे यांच्यामधील वादानंतर अनिल पुंबळे यांना पदावरून काढून टाकण्यात आले. येथे कर्णधाराचे वर्चस्व दिसून आले. प्रशिक्षकाची निवड करण्याची शक्ती, मुभा कर्णधार विराट कोहलीला कशी काय मिळू शकते? अशाप्रकारची घटना जगातील कोणत्या संघामधून घडताना दिसत नाहीत. विनोद रॉय यांच्या अध्यक्षतेखाली सीओएने विराट कोहलीच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. ही खेदजनक बाब.

प्रशासकीय समिती धोनीला घाबरली
महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयच्या करारातील ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये टाकण्यात यावे असे मी प्रशासकीय समितीत असताना म्हणालो होतो. कारण ए ग्रेडमध्ये वर्षभर क्रिकेट खेळणाऱया क्रिकेटपटूंनाच स्थान देण्यात येते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी फक्त झटपट क्रिकेट खेळणार होता. पण येथे बीसीसीआय पदाधिकार्यांपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीतील सदस्यच घाबरत होते. मी याचा विरोध केला. पण त्यानंतर काही झाले नाही, त्यामुळे शब्दरूपात मला लिहावे लागले, अशा शब्दांत रामचंद्र गुहा यांनी आपले मत व्यक्त केले.

अमित शहा, एन. श्रीनिवासन हिंदुस्थानी क्रिकेट चालवताहेत
अमित शहा व एन. श्रीनिवासन या व्यक्ती आपल्या कुटुंबासह हिंदुस्थानातील क्रिकेट चालवत आहेत, असेही रामचंद्र गुहा यावेळी या मुलाखतीदरम्यान म्हणाले. क्रिकेटपटू व कर्णधार म्हणून सौरभ गांगुलीबद्दल प्रचंड आदर होता. पण आता तो शरण येऊ लागलाय. त्याने शस्त्र टापून दिले आहेत. हितसंबंधाच्या मुद्यात तो अडकलाय. तो जे करतोय ते योग्य नाहीए, असेही रामचंद्र गुहा यांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या